थेरपीस्टचा स्वतःचा अनुभव
थेरपीस्ट स्वत: थेरपीच्या अनुभवातून गेलेला असतो, त्यानं स्वत: त्याच्या थेरपीस्टच्या मदतीनं आपल्या मनातले क्लेश जाणलेले असतात. क्लेश उरात बाळगल्यानं, स्वत:च्या वागण्यावर झालेले परिणाम त्यानं पाहिलेले असतात. त्यातून उद्भवणारे शारीरिक त्रास समजून घेतलेले असतात. थेरपीस्टपुढे क्लेश व्यक्त करताना होणार्या विविध अडचणी त्यानं समजून घेतलेल्या असतात.
तो हे लक्षात घेतो की -
"मी एक सर्व-सामान्य माणूस आहे,
माझ्या मनात राग-द्वेष-मत्सर-लोभ-तिरस्कार-निराशा यासारख्या भावना निर्माण होत असतात.
कटू सत्य पचवण्याच्या माझ्या प्रयत्नात, माझ्या विषयी पराभवजन्य घट्ट समजुती लहानपणी मीच निर्माण केलेल्या असतात.
माझं उस्फूर्त वागणं आणि नियोजनबद्ध वागणं कसं असावं हे त्या ठरवत असतात.
माझे दु:ख, माझे क्लेश ही माझी निर्मिती आहे,
दुसरं कोणीही याला जबाबदार नाही".
स्वतःच्या व इतरांच्या रोजच्या वागण्यात डोकावत असणार्या भ्रामक समजुती लक्षात घेणं, त्यांच्या काल्पनिकतेचं कवच वास्तवाचे निकष लावून फोडणं, या समजुतींच्या पगड्यातून बाहेर येऊन 'आत्ता आणि इथं' अस्तित्वात असलेलं वास्तव जसंच्या तसं पहाण्याची क्षमता थेरपीस्ट स्वत: मिळवतो.
या अनुभवाचा त्याला पेशंटला मदत करताना उपयोग होतो. अशा थेरपीस्टचं संवेदनात्मक अस्तित्व आणि त्यानं केलेला स्वीकार पेशंट्च्या दृष्टीनं महत्वाचा असतो.