अंतर्मन
मोठं होण्याच्या नैसर्गिक प्रवासात सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या क्लेशातून प्रत्येक मूल गेलेलं असतं. आपल्या भोवती दिसणार्या विविध घटनांचे अर्थ ते आपल्या परीनं लावत असतं. अपघात-वियोग, मृत्यू, आजारपण या सारखी कटू सत्ये कशी पचवायची आणि पुढं कसं जायचं, आपल्याला हवं ते कसं मिळवायचं यासाठी प्रत्येक मूल प्रयत्न करीत असतं.
मोठी माणसं अशी का वागतात? मी नेमकं कसं वागायचंय? मला शिक्षा का होते? मला ही माणसं का रागवतात? या सारख्या संभ्रमात लहान मुलं पडतात. आसपासच्या परिस्थितीचा प्रभाव प्रत्येक मुल वेगळ्या प्रकारे करून घेतं. कोणत्या वेळी कसं वागायचं आणि कसं नाही हे ते नकळत नकळत ठरवत असतं.
काही गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडतात, काही नाही. मनाप्रमाणे घडलं की त्याला सुख होतं आणि नाही घडलं की दुःख. असे सुख-दु:खांचे अनुभव त्याला रोज येत असतात.
लहान मुल, ते आणि त्याच्या भोवतालचं जग याविषयी एक तात्पुरती का होईना एक कल्पना करतं व त्याच्यापुरता मनावरचा ताण हलका करतं. उदा. मी सगळ्यांचा नावडता आहे, माझ्यावर कोणाचं प्रेम नाही. मी इतरांपेक्षा वाईट आहे इ.
अशा प्रकारे अपेक्षा, अपेक्षाभंग यांच्या आवर्तनात माणूस मोठा होत जातो. एखादी गोष्ट तो का करतो आणि का करीत नाही यामागचं रहस्य (भ्रामक समजुत) तो मोठेपणी बरेचदा विसरूनही गेलेला असतो.
त्याच्या अंतर्मनात अनेक कटू आठवणी दडलेल्या असतात. अगदी जवळच्या आणि मनावर परिणाम करणाय्रा माणसांविषयी व घटनांविषयी त्याच्या मनात द्वेष, असूया, मत्सर, संताप, चीड, घृणा, तिटकारा दडलेला असतो. काही चुकीच्या वागण्याबदद्लची शरम, लाज, संकोचही वाटत असते. काही माणसांविषयी त्याला आकर्षण वाटत असते. काही नकोशा स्मृती तर काही हव्याश्या स्मृती असतात.
हा कप्पा त्याचा हक्काचा असतो. हा गुप्त ठेवा कोणालाही कळू न देण्याची धडपड तो करीत असतो. त्यानं त्याभोवती एक कडेकोट किल्ला उभा केलेला असतो. थेरपीस्टच मुख्य काम मनाच्या याच भागावर असतं.
