पेशंट की केस की क्लायंट
थेरपीसाठी आलेल्या व्यक्तीला काय म्हणायचं?
थेरपीसाठी आलेल्या व्यक्तीला कार्ल रॉजर्सनं व्यक्ती (इंग्रजीमध्ये पर्सन) असं म्हणायला सुरुवात केली.
डॉक्टर व्यावसायिक विशेषत: मानसोपचारतज्ञ साधारणपणे पेशंट म्हणतात.
मानसज्ञ आणि सोशल वर्कर यांचा केस म्हणण्याकडं कल असतो.
मी काय प्रकारे संबोधते-
कमी तीव्रतेचा त्रास असेल आणि स्वत:च्या उन्नतीसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर मी तिला क्लायंट म्हणते.
बरेच क्लायंट लौकिकार्थानं यशस्वी असू शकतात. ते कार्यशील असू शकतात.
मध्यम तीव्रतेचा त्रास असलेल्या व्यक्तींना मी पेशंट म्हणते.
पेशंट या मुळच्या लॅटिन शब्दाचा अर्थ सोसणारा, सहन करणारा असा आहे. हा अर्थ शारीरिक-मानसिक क्लेश सोसणार्या व्यक्तीसाठी चपखल आहे. अशा प्रकारचे त्रास असलेले लोक यशस्वी होण्याचा स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यात सतत अडचणी येत रहातात. या अडचणींना निर्धारानं तोंड देणं त्यांना नेहमीच जमतं असं नाही.