थेरपीला मिळू लागलेली समाजमान्यता:

आपली मनोशारिरीक उलघाल का होतेय? ती कमी करता येईल का? पुन्हा हा त्रास होऊ नये यासाठी काही उपाय करता येईल का, याचा शोध घेण्याची गरज गेल्या पाच एक वर्षात अनेक स्तरातल्या शहरी-निमशहरी, शिक्षित, जागरुक, प्रगतीशील नागरिकांना जाणवतेय असं विधायक चित्र दिसते आहे.

थेरपीला जाताना आसपासची लोकं मला पहातील का? हे लोक मला वेडं म्हणतील का? मला वाळीत टाकतील का? पूर्वी सर्वसकट सर्वांच्या मनात दिसणारी ही भीती नक्कीच कमी झालीय.

जागतिक चिंताक्रांत स्थिती:

विभक्त कुटुंबपद्धती, अतिशय वेगानं बदलत असलेलं समाजचित्र, रोजचं जगणं, शिक्षण, व्यवसाय, अर्थ, नाती यामध्ये भेडसावणारी असुरक्षितता, अनिश्चितता, आपुलकीचा अभाव, स्वार्थी संकुचित चंगळवादी जीवनशैली, जागतिक अस्वस्थता आणि विधायक जीवनमूल्यांचा र्‍हास यातून निर्माण झालेली सततची चिंताक्रांत स्थिती कोणालाच नकोशी झालीय.

"मदत हवी वाटते पण उपदेशाची भुणभुण नको आहे, कृतज्ञता मान्य आहे पण मानसिक गुलामगिरी नको वाटतेय. `'आमच्या वेळी असं होतं'' हे ऐकणं कटकटीचं वाटतं.

स्वस्थता हवी आहे, शांति हवी आहे, पण कुठे-कशी मिळवायची, त्यासाठी वेळ कसा काढायचा हा एक भला मोठा प्रश्न आहे", असं सांगणारी माणसं मला अनेकदा भेटतात.