थेरपी व थेरपीस्ट विषयीचे समज-गैरसमज:
१) थेरपीस्ट मला समजून घेऊ शकणार नाहीत:
थेरपीस्टची मदत घेण्याच्या निर्णयापूर्वी मुख्य प्रश्न अनेकांपुढं असा असतो की जर "मला इतकी वर्ष पहाणारी माझ्या जवळची माणसं मला समजून घेऊ शकत नसतील, तर कधी न पाहिलेली ही परकी व्यक्ती मला कशी काय समजून घेऊ शकेल?`"
२) मी परक्यावर विश्वास कसा ठेवू?
शिवाय थेरपीस्टबद्दलच्या विश्वासार्हतेचाही प्रश्न अनेकांना असतो. त्यांना असं वाटतं की "जवळच्या माणसांविषयी जिथं मला विश्वास वाटत नाही तिथं या परक्या व्यक्तीविषयी कसा वाटेल? मी ज्यांच्याविषयी या थेरपीस्टपाशी तक्रार करणार, माझ्या मनातल्या नकारात्मक भावना सांगणार, त्यांच्यापाशी ह्यांनी माझं बिंग फोडलं तर?"
३) थेरपीस्ट दुसर्याची बाजू घेतील:
"शिवाय न जाणो कदाचित ह्या थेरपीस्ट माझी बाजू न घेता माझ्याच चुका काढतील, मीच बदलायला पाहिजे असं म्हणतील. मग काय उपयोग? खरं म्हणजे जे मला त्रास देतात त्यांनीच बदलायला पाहिजे, मीच एकट्यानं का म्हणून नेहमी पडतं घ्यायचं?" अशी तक्रार काही जणांची असते.
४) थेरपीस्टना वैयक्तिक प्रश्न नसतात का?
अजून एक महत्वाचा मुद्दा काही जणांच्या मनात असतो की ``जी व्यक्ती थेरपीचं काम करते तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात काहीच प्रश्न नसतात का? तिला जर काही प्रश्न नाहीत तर तिला माझे प्रश्न कसे समजणार?
५) ही चमत्कार करते का?
काहींना वाटतं- आमचे प्रश्न थेरपीस्ट कशा पद्धतीनं सोडवते? आमचे प्रश्न ही सोडवते म्हणजे चमत्कार करते की काय?"
६) मानसिक अवलंबनाची भीती:
काहींनी तर अशी भीती माझ्यापाशी नंतर बोलून दाखवली की, "मी तुमच्यावर अवलंबून तर रहाणार नाही? मला तुमच्या मदतीची सवय होईल आणि मग माझं सारखच अडेल. जशी रक्तदाब कमी करण्याची औषधं कायम घ्यावी लागतात तसं मला आयुष्यभर थेरपीला यावं लागेल."


