मात्र मनातलं दु:ख बोलण्यासाठी आपल्याला समजून घेऊ शकतील, आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वीकारू शकतील अशा व्यक्तींची वानवा पेशंटला अनेकवेळा जाणवत असते.

अशा व्यक्ती पेशंटच्या आसपास नसतातच असं अजिबात नाही. मात्र त्यांचे काही नातेसंबंध असतात त्यामुळं पेशंट पूर्ण मोकळेपणानं बोलू शकत नाही. शिवाय मदत करणार्‍याची नजर नात्याच्या/मैत्रीच्या अडसरामुळं प्रदूषित होईल असं पेशंटला वाटू शकतं. त्यांच्या मनातला आदर कमी होईल अशी पेशंटला भीती असते.

आपला कोणी गैरफायदा तर घेणार नाही अशी शंका वाटत असते.

"त्यानं माझ्यासाठी किती केलं, मी त्याच्यासाठी किती केलं", यासारख्या छुप्या हिशेबानं आपल्या वाटणार्‍या कटकटीत भर पडेल की काय असंही त्यांना वाटत असतं. आपल्यातल्या कमतरता कळल्यानं समाजात आपला कोणी मान ठेवणार नाही, याची जणूकाही खात्रीच त्यांना वाटत असते.

अनेकजण मला त्यांचा अनुभव असा सांगतात की- " जवळच्यांना जवळचे कसं काय म्हणायचं? माझ्या जवळची माणसं मलाच नावं ठेवतात, माझेच दोष दाखवतात. तूच चुकला असशील." असं म्हणतात.

क्लायंटचे नातेवाईक इतरांची बाजू घेतात. त्याच्या/तिच्या कहाण्या ऐकून त्रासतात, त्याला/तिला टाळतात.

त्यांना त्यांच्या चुका दाखवल्या तर ते मान्य करीत नाहीत, उलट अन्याय करीत रहातात, जाणूनबुजून क्लेश देतात: असं क्लायंटला वाटतं.

काही पेशंट सांगतात की माझ्या अपेक्षा कोणीच समजून घेत नाहीत. मात्र माझ्याकडून फार अपेक्षा करतात.

कधी कधी काही क्लायंटला उलट अनुभव येतात: त्यांचे काही नातेवाइक स्तुती करतात, धीर देतात, चांगले वागतात. "त्यांनी इतका वेळ देऊन मला मदत करण्याइतका काही मी चांगला नाहीये", असं क्लायंटला वाटतं.

"मी नेमका कसा आहे कोणास ठाऊक? मीच मला समजू शकत नाही तर इतर कोणालाही माझं मन कधी समजणार नाही" असंच बर्‍याचजणांना वाटतं".

>