आपलं आरोग्य टिकवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले की आपल्यामध्ये विस्कळ निर्माण होऊ लागते. काही अडथळे आपण निर्माण करतो, अंगावर ओढवून घेतो किंवा ते आपत्ती म्हणून येतात. असा प्रकारे मारक वातावरणाची सरशी झाली, बचाव करणारया आपल्या यंत्रणा दुबळया झाल्या की आपल्यामध्ये रोगनिर्मिती होते..

आपल्याला शारीरिक-मानसिक व्याधी होतात. आपलं शरीर वेदना सोसतं, ते परावलंबी होतं. आपलं मन दु:खी होतं, निराश होतं, काळजीग्रस्त होतं. आपल्या बौद्धिक क्षमता क्षीण होतात. आपला आत्मविश्वास तात्पुरता कमी होतो.

या व्याधींमुळे आपल्या शिक्षणावर-कौटुंबिक जीवनावर-व्यावसायिक उलाढालींवर, सामाजिक नातेसंबंधावर तात्कालिक परिणाम होतात. रोगावर योग्य उपचार आपण करून घेतले की आपला आत्मविश्वास आपण परत मिळवतो आणि पुढची व्याधी येईपर्यंत आपण आरोग्यसंपन्न होतो.

रोग-आरोग्य,बरं वाटणं आणि बरं नसणं यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो... समुद्रातल्या भरती-ओहोटीसारखा. निसर्गचक्र आहे, याला कोणीही अपवाद नाही. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला वेगळा नियम नाही.