आपले आरोग्य टिकवण्यासाठी
आपले आरोग्य ही एक गतिमान स्थिती असते. सतत बदलती असते. काळ, वेळ, दिवस, रात्र, ऋतु, प्रदेश, वातावरण यातील बदलांप्रमाणे आपल्यामध्ये सतत बदल आपण जाणता-अजाणता घडवीत असतो. माणूस आणि त्याच्या आतलं आणि बाहेरचं वातावरण यामध्ये सतत देवाणघेवाण चालू असते.
वातावरण पोषकही असतं आणि मारकही असतं. यातून स्वत:चा विकास करुन घेणं हे उपजत शहाणपण माणसात असतं. मारक वातावरणाला आपल्यावर कुरघोडी करण्यापासून परावृत्त करण्याचं कामही आपल्याला सतत करावं लागतं. आपल्या या दोन्ही प्रकारच्या म्हणजे पोषण करुन घेणार्या आणि बचाव करणा्र्या क्षमतांना सतत धार करणं, जगण्यासाठी आणि उन्नतीसाठी गरजेचं असतं.
आपले आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. उदा.
- योग्य सकस नियमित आहार घेणं,
- आवश्यक-नियमित व्यायाम करणं,
- पुरेशी विश्रांती घेणं,
- शिक्षण-व्यवसायामध्ये प्रगती चालू ठेवणं,
- आर्थिक स्थैर्य राहील असं पहाणं,
- कौटुंबिक-सामाजिक नातेसंबंधामध्ये आपुलकी-विश्वासाचा अंतर्भाव असणं, भविष्याची तरतूद करीत रहाणं,
- सर्जनशीलतेची जोपासना करणं,
- हे सर्व चालू असताना अंर्तमनातील व्दंव्दांची जाणीव करून घेणं आणि द्वंद्वाचा निरास करीत रहाणं.
आपण निरोगी असलो की आपली उन्नती आपण करून घेऊ शकतो. उन्नतीची व्याख्या माणसागणिक वेगळी असू शकते. आपलं मानसिक समाधान हे उन्नतीचं द्योतक मानायला हरकत नाही.