कमी किंवा मध्यम त्रास असणारे
स्वत:च्या मनातल्या प्रश्नांचा जो परिणाम आपल्या वागण्यावर-बोलण्यावर झालाय, तो काही फारसा चांगला नाही, त्याचा मला व इतरांना त्रास होतोय असं एखाद्या माणसाच्या जेव्हा लक्षात येतं, तेव्हा थेरपीस्टची मदत घ्यायला हवी असं तिला वाटू शकतं.
हा वागण्यावर, बोलण्यामधला बदल हळुहळू होत गेलेला, कमीजास्त होणारा, अचानक दिसू लागलेला, घरातील अथवा हितसंबंधी लोकांच्या मदतीला अधूनमधून दाद देणारा असा असू शकतो.
हे बदल कमी अथवा मध्यम तीव्रतेचे आणि वारंवारतेचे असतात.
यातील बरेच बदल थेरपीसाठी आपण होऊन येणार्या व्यक्तीला स्वत:ला जाणवतात व त्या तसं सांगू शकतात.
- स्वत:ची आणि अथवा इतरांची काळजी वाटत रहाणं,
- कधीकधी भीती वाटणं,
- अधूनमधून रडू येणं,
- अभ्यासात लक्ष न लागणं,
- नेहमीपेक्षा मार्क कमी पडणं,
- सारखा राग येणं,
- सुन्नपणे एकटं बसावंसं वाटणं,
- अस्वस्थ असणं,
- आसपासच्या माणसांबरोबर भांडणं,
- बारीकसारिक गोष्टींचा ताण येणं,
- आत्मविश्वास कमी पडतोय असं वाटणं,
- निर्णय घेताना अडचणी येणं,
- अधूनमधून उदास वाटणं,
- कधीतरी आत्महत्येचे विचार येणं,
- कधीतरी एकटं वाटणं,
- अधूनमधून निराधार वाटणं,
- शांत-सलग झोप न लागणं,
- तेचतेच विचार मनात येत रहाणं,
- अपराधी वाटणं (मन खात रहाणं, मनाला टोचणी लागणं),
- नोकरी सुटणं,
- धंद्यामध्ये नुकसान होणं,
- कोण काय म्हणेल याची चिंता वाटणं,
- मन भूतकाळामध्ये गुरफटलेलं रहाणं,
- शरीरामध्ये कुठं ना कुठं वेदना होत रहाणं,
- डोकं दुखणं,
- दिशाहीन वाटणं,
- कमीपणाची भावना निर्माण होणं,
- वजनावर परिणाम होणं,
अशा एक वा अनेक प्रकारे या माणसांना त्रास होत असतो.