आपल्या मनाचे तीन भाग आहेत (डॉ. सिग्मंड फ्रॉईड)

१) आपल्यातलं लहान मूल (Id)

हे भावनाप्रधान, पोरकट, हेकेखोर, भोळसट, अव्यवहारी, हळवं, आशावादी, बंडखोर, बापुडवाणं, मतलबी, स्वप्नरंजन करणारं, कल्पनेच्या जगात जगणारं, स्वतःला विशेष समजणारं, इतरांच्या कडून प्रेमाची, आपुलकीची, सहानुभूतीची, मदतीची, सहवासाची, प्रोत्साहनाची सतत अपेक्षा करणारं असतं.

कुणी रागावलं, नाराज झालं, अबोला धरला की हे खट्टू होतं, निराश होतं, जिवाला त्रास करून घेतं. इतरांचं लक्ष वेधण्य़ाची गरज याला भासते. हे प्रेमाचं भुकेलं असतं. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्याची तयारी असते. हे बेजबाबदार असतं, घेतलेल्या निर्णयामुळे कोणते होतील याचा विचार नसतो.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला काय हवंय हे मनाच्या या भागाला चांगलंच कळ्त असतं. मात्र आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं त्याला वाटत असतं.